मिरजेत अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव : दिग्गज कलाकारांचे गायन-वादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 19:12 IST2018-10-09T19:06:42+5:302018-10-09T19:12:46+5:30

मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाच्या नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन आज, बुधवार, दि. १० रोजी सायंकाळी ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मुजुमदार यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या

Mirjat Ambabai Navaratri Music Festival: Singing and Playing Singers | मिरजेत अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव : दिग्गज कलाकारांचे गायन-वादन

मिरजेत अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव : दिग्गज कलाकारांचे गायन-वादन

ठळक मुद्दे संगीतप्रेमींसाठी मेजवानी . यावर्षी जपानी कलाकार ताकाहिरो आराई यांचे संतुरवादन होणार

मिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव मंडळाच्या नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन आज, बुधवार, दि. १० रोजी सायंकाळी ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मुजुमदार यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

दि. १० ते १८ पर्यंत आयोजित अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात पंडित रोणू मुजुमदार यांचे बासरीवादन, पंडित उपेंद्र भट, पंडित अर्नब चटर्जी, आभा पुरोहित यांचे गायन, डॉ. खुशबू मदनलाल यांचे तबलावादन यासह दिग्गज कलाकार गायन-वादन करणार आहेत. याशिवाय नीलिमा हिरवे नृत्य सादर करणार आहेत.

दि. ११ रोजी मिरजेचे संगीतकार ‘राम कदम पुरस्कार’ गायक पंडित उपेंद्र भट व तबलावादक पंडित विठ्ठल क्षीरसागर यांना देण्यात येणार आहे. दि. १२ रोजी ख्यातनाम तबलावादक ‘डॉ. अबन मेस्त्री पुरस्कार’ महिला तबलावादक डॉ. खुशबू मदनलाल यांना देण्यात येणार आहे. रोणू मुजुमदार यांच्या बासरीवादनाने बुधवारी संगीत महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. संगीत महोत्सवात संगीतकार राम कदम यांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम, डॉ. खुशबू मदनलाल यांचे सोलो तबलावादन, पंडित अर्नब चटर्जी, आभा पुरोहित, गायत्री जोशी, अमिता गोखले, अनुरत्न रॉय, राजश्री भाटवडेकर, मंगला जोशी, पंडित अलका देव, मीनल नातू, मंजिरी करवे, कृष्णा मुखेडकर, ऋषिकेश बोडस यांचे शास्त्रीय गायन, नीलिमा हिरवे यांचे कथ्थक नृत्य, उस्ताद छोटे रहिमत खान यांचे सतारवादन, पंडित सचिन पटवर्धन यांचे स्पॅनिश गिटारवादन, पंडित सुधांशू कुलकर्णी यांचे सोलो हार्मोनियमवादन, कौस्तुभ देशपांडे व सहकाऱ्यांचा ‘आनंदतरंग’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

संगीत रसिकांसाठी मेजवानी असलेल्या अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचा समारोप गुरूवार, दि. १८ रोजी होणार आहे.
नवरात्र संगीत महोत्सवात गतवर्षी प्रथमच नॅश न्युबर्ट या परदेशी कलाकाराने बासरीवादन केले होते. यावर्षी जपानी कलाकार ताकाहिरो आराई यांचे संतुरवादन होणार आहे.

Web Title: Mirjat Ambabai Navaratri Music Festival: Singing and Playing Singers